भोंग्यावरून मनसेच्या भूमिकेबाबत आशिष शेलार यांचा मोठा गौप्यस्फोट

0

मुंबई,दि.2: भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलताना भोंग्यावरून मनसेच्या भूमिकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरुन भाजपा मनसेला पुढे करीत असल्याचा आरोप केला जात असला तरी यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असावा, अशी गुगली आशिष शेलार यांनी टाकली आहे. 

मशिदीवरील भोंगे हटविणे, हनुमान चालीवरुन भाजपा मनसेला पुढे करीत असल्याचा आरोप केला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी वाटते. मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर डोळा ठेवूनच शिवसेनेला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचा वापर करुन घेत असावी, असा गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला आहे. ते ‘लोकसत्ता’ एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

हनुमान चालीसा हा भाजपाचा कार्यक्रम नाही. पण हनुमान चालीसाच्या पठणाला कुणी रोखत असेल तर त्यास भाजपाचा नक्कीच विरोध असेल, असंही शेलार म्हणाले. राम मंदिर, रामसेतू, 370 कलम रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा इत्यादी प्रमुख मुद्द्यांवर भाजपाची भूमिका नेहमीच स्पष्ट राहीली आहे. आमची भूमिका मांडण्यासाठी आम्हाला कुणालाही पुढे करण्याची गरज नाही, असंही शेलार म्हणाले. 

आशिष शेलार यांनी यावेळी आमचे कोणत्याही पक्षासोबत शत्रुत्व नसल्याचं स्पष्ट केलं. “शिवसेनाच काय, काँग्रेस, राष्ट्रवादी या कुणाहीबरोबर भाजपाचं शत्रुत्व नाही. हे सारे आमचे राजकीय विरोधक आहेत. शिवसेनेच्या विश्वासघातकी कार्यपद्धतीमुळे आमच्यात वितुष्ट निर्माण झाले. युतीचा फायदा खरंतर दोघांनाही झाला आहे. दोघांचाही पक्ष विस्तारत गेला आहे. इतकंच काय तर शिवसेनेचा विस्तार भाजपामुळे जास्त झाला, असा दावाही शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी आगामी काळात राज्यात भाजपा स्वबळावर सत्तेत येईल असाही दावा केला. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढले तरी आगामी निवडणुकांमध्ये चित्र फार वेगळं असेल. राज्यात भाजपा सत्तेत येईल, असं शेलार म्हणाले. गेल्या ३० वर्षांत भाजपा वगळता इतर कोणत्याही पक्षाला आमदारांची शंभरी गाठता आलेली नाही. अगदी राज्यातील सर्वोच्च नेते म्हणून गणना होणाऱ्या नेत्यांच्या पक्षाचेही 100 आमदार कधीही निवडून आलेले नाहीत, असा जोरदार टोला शेलार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here