मुंबई,दि .27: भाजपाचे आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. दैनिक लोकसत्ता आयोजित कार्यक्रमात आशिष शेलार यांनी गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून राज्यात सर्वाधिक राजकीय चर्चा झाली असेल तर ती शिवसेना आणि भाजपाच्या तुटलेल्या युतीची आणि शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनैसर्गिक वाटणाऱ्या अशा आघाडीची. पण यासोबतच महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या सकाळी घेतलेल्या शपथविधीची देखील जोरदार चर्चा रंगली. अजूनही ही चर्चा रंगते. मात्र, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये 2017 मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला आहे. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना आशिष शेलार यांनी 2017 साली घडलेल्या घडामोडींविषयी सविस्तर माहिती दिली.
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी या कार्यक्रमात शिवसेनेसोबतच्या तुटलेल्या युतीसंदर्भात विचारणा केली असता दिलेल्या उत्तरात आशिष शेलार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्याही दोन वर्ष आधी अर्थात 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी देखील झाल्याचं ते म्हणाले.
आशिष शेलार यांनी सांगितला घटनाक्रम!
भाजपाला २०१७मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी अस वाटू लागलं होतं, असं आशिष शेलार म्हणाले. “2017चा काळ होता. जेव्हा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युती करावी असं वाटू लागलं. शिवसेनेचं रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपा असं सरकार करावं, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं ठरवलं की आपण तीन पक्षांचं सरकार करू”, असं आशीष शेलार यांनी सांगितलं.
तरच राष्ट्रवादीसोबत युती
2017मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं युती करायला नकार दिल्याचं आशिष शेलार यावेळी म्हणाले. “आम्ही तेव्हा म्हटलं तीन पक्षांचं अर्थात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीनं याला नकार दिला. आमचं शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत येत असताना भाजपानं शिवसेनेला सोडायला नकार दिला. पण 2019ला सत्ता दिसल्यावर मात्र शिवसेनेनं भाजपाला सोडायची भूमिका सहज घेतली”, असं आशिष शेलार म्हणाले.