विनायक दीक्षित/कुर्डुवाडी,दि.५:भोसरे ता.माढा येथील बागल वस्तीतील तीन घरांवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चार सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करुन रोख रकमेसह सुमारे १ लाख २४ हजारांचा मुद्देमाल लूटला. ही घटना दि.५ रोजी पहाटे ३.३० ते ३.४५ वा. च्या सुमारास घडली. याबाबत दत्तात्रय शिवाजी बागल रा. बागल वस्ती भोसरे यांच्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी दत्तात्रय बागल हे आपल्या कुटुंबासमवेत जेवण करुन घरामध्ये झोपले होते. पहाटे अचानक ३.३० ते ३.४५ वा दरम्यान दरवाजाचा आवाज येत असल्याने पत्नीने पती दत्तात्रय यास उठवले तोपर्यंत बाहेर असणाऱ्या अज्ञात चार दरोडेखोरांनी दरवाजा जोरात ढकलून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या हातात लाकडी काठी,तलवार आणि घाव होते. फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील दीड गोळ्याचे गंठण, अर्धा गोळ्याचे कानातील टाॅप्स, फुले व पायातील चांदीचे पैंजण जबरदस्ती काढून घेतले.
फ्रिजवर असलेले मोबाइल,लॅपटाॅप आपटून फोडले.नंतर घराला बाहेरून कडी लाऊन समोरच काही अंतरावर असलेल्या फिर्यादीच्या वडिलांच्या घरी या दरोडेखोरांनी मोर्चा वळवला व फिर्यादीच्या आई वडिलांना काठीने मारून त्यांच्याजवळील रोख रक्कम २५ हजार रोख रक्कम व वडिलांची एक तोळा सोन्याची अंगठी व इतर दागिने असा एकूण १ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून ते चारही दरोडेखोर त्यांच्या मोटारसायकलवर रेल्वेच्या बाजूकडील रस्त्याने निघून गेले. श्वानपथकांना पाचारण करण्यात आले आहे.याबाबत कुर्डुवाडी पोलिसांचीही विविध पथके आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाली आहेत.
भोसरे येथील दरोडा पडलेल्या संबधीत घरांना मी भेट दिली आहे. स्थानिक पोलिसांची विविध पथके तयार केली असून ती लवकरच संशियतापर्यत पोहचतील.मात्र सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.
तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर