Ajit Pawar: आम्हाला आमच्या जातीचा आणि समाजाचा अभिमान नाही का? शिवबांनी आपल्याला काय शिकवलंय?: अजित पवार

0

पुणे,दि.19: Ajit Pawar: मराठा आरक्षणकरिता (maratha reservation) मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले होते. मराठा समाजाची या सरकारने निराशा केली आहे असा संदेश समाजात गेला आहे. शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या एकाने मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना विचारणा केली. त्यावेळी अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रतिप्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेल्या समारंभादरम्यान घडलेल्या या प्रसंगाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. अजित पवार यांचं भाषण सुरु असताना ते ओबीसी आरक्षणाबाबत बोलत होते. तितक्यात खाली बसलेल्या गर्दीतून एका तरूणाने सर्वांदेखत मराठा आरक्षणावरून अजित पवार यांना जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हा अजित पवार यांनी तरुणाला शांत बसवायचा प्रयत्न केला. तरीही हा तरूण बोलतच होता.

तेव्हा अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी म्हटले की, तुम्हाला मी मगाशी बोलून दिले आहे. ही बोलायची पद्धत नव्हे. तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आलायत का, अशा शब्दांत अजित पवार यांनी संबंधित तरुणाला चांगलेच झापले. आज शिवजयंती आहे. हा मुद्दा आत्ता उपस्थित करण्याचे कारण नाही. या व्यासपीठावर मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील बसलो आहोत. आम्ही पण मराठ्याच्या पोटीच जन्माला आलो आहोत ना. मग आम्हाला आमच्या जातीचा आणि समाजाचा अभिमान नाही का? शिवबांनी आपल्याला काय शिकवलंय? छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. ही गोष्ट सगळ्यांनाच मान्य करावी लागेल.

तरुण मुलांचं रक्त सळसळतं असतं. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. यामधील कायेदशीर बारकावेही लक्षात घेतले पाहिजेत, असे अजित पवार यांनी म्हटले. बाळसााहेब थोरात, सीताराम कुंटे, मुख्यमंत्री आणि मी असे चार-पाचजण पंतप्रधानांना भेटलो. आम्ही पंतप्रधानांकडे 12 मागण्या केल्या. त्यातील मराठा आरक्षणाची पहिली मागणी होती. पंतप्रधानांनी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं, असेही अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांनीही मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या उपोषणाच्या भूमिकेवर फेरविचार करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here