सोलापूर,दि.२६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताला आणखी एक झटका दिला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर ५०% टॅरिफ लावले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑक्टोबरपासून परदेशी औषधे, स्वयंपाकघरातील कॅबिनेट, फर्निचर आणि जड ट्रकवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की हे पाऊल देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेला सर्वाधिक औषधे भारत निर्यात करतो. भारतातून आयात होणाऱ्या वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावला होता. 27 ऑगस्ट 2025 पासून हा टॅरिफ लागू झाला आहे. यामुळे कपडे, खड्यांचे दागिने, फर्निचर, मासळी उद्योग संकटात आले आहेत.
यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने फार्मा सेक्टरला टॅरिफ लावलेला नव्हता, मात्र आता यावर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘ट्रुथ’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प यांनी औषधांवर टॅरिफ लावण्यात आल्याची माहिती दिली.
ट्रम्प म्हणाले की, औषधांवर १००% कर, स्वयंपाकघरातील उपकरणांवर आणि बाथरूम व्हॅनिटीजवर ५०% कर, अपहोल्स्टर्ड फर्निचरवर ३०% कर आणि जड ट्रकवर २५% कर लावला जाईल.
ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “१ ऑक्टोबर २०२५ पासून आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पादनावर १००% कर लादणार आहोत. जर कंपन्या अमेरिकेत उत्पादन प्रकल्प बांधत असतील तरच त्यांना करातून सूट मिळेल . जर त्या कंपन्या “ब्रेकिंग ग्राउंड” किंवा “बांधकामाधीन” असतील तर त्यांना सूट मिळेल.”








