Anjali Damania: अंजली दमानिया यांचे नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप 

0
अंजली दमानिया-नितीन गडकरी

मुंबई,दि.27: Anjali Damania On Nitin Gadkari: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपा नेते मंत्री नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. विकासप्रिय नेते, काम करणारे नेते अशी गडकरी यांची ओळख होती. देशातील अनेक राज्यात त्यांनी केलेल्या रस्त्यांची चर्चा होत असते. अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर गंभीर आरोप केले आहेत.

संपूर्ण देशामध्ये रस्त्यांचे काम वेळेत करण्यामध्ये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यामध्ये नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. दरम्यान, याच विभागामध्ये काम करताना नितीन गडकरी यांनी अनेक उलथापालथ केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात टोलच्या माध्यमातून मिळवलेले पैसे हे स्वतःच्या मुलांच्या कंपनीमध्ये वळवले गेले आहेत, असा आरोप दमानिया यांनी गडकरी यांच्यावर केला आहे. 

गडकरी यांच्या मुलांच्या कंपन्यांवर रस्ते आणि टोलच्या संदर्भात दमानिया यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. आयडीएल नावाच्या खाजगी कंपनीने गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले, असा आरोप आहे. दमानिया यांनी असा दावा केला आहे की, 3200 कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या बँकांना केवळ 300 कोटी रुपये देऊन सेटलमेंट करण्यात आले. या प्रकरणी निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांच्या कंपन्यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. 

दमानिया यांनी ईडी आणि सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांवरही टीका केली आहे. भाजपचे केशव उपाध्ये यांनी हे आरोप 2013 पासूनचे असून त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी दमानिया यांच्या आरोपांच्या वेळेवर आणि हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या आरोपांवर गडकरी यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

नितीन गडकरी यांच्यावर इथेनॉल संदर्भातही दमानिया यांनी गंभीर आरोप केले. इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या आहेत. अशा 108 कंपन्यांचे तपशील आहेत आणि या कंपन्यांची माहिती उघड केल्यास वर्षभर पुरेल, असे देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here