महाराष्ट्राच्या जनतेची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे अनिल परब यांचे आवाहन

0

अनिल परब भीती निर्माण करत आहेत, एसटी विलीनीकरणीशिवाय मेस्मा लागू शकत नाही : गुणरत्न सदावर्ते

मुंबई,दि.3: महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता एसटीची आतुरतेने वाट पाहत आहे. शाळा महाविद्यालयात जाणारे लाखो विद्यार्थी – विद्यार्थिनी, जेष्ठ नागरिक, कामावर जाणारे शेतकरी, शेतमजूर अशा अनेक गोरगरीब प्रवाशी जनतेची एसटीअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी कामगारांनी कामावर यावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अड अनिल परब यांनी केले. सरकार म्हणून केवळ कर्मचाऱ्यांचा विचार करून आम्हाला चालणार नाही तर एसटीवर अवलंबून असणाऱ्या राज्यातील तमाम सर्वसामान्य कष्टकरी जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, परंतु त्यांची कोणी अडवणूक करत असेल अशा लोकांवर कठोर कारवाई करणार, असा इशारा मंत्री अड परब यांनी आज दिला.

एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्री अड. अनिल परब यांनी आज एसटी महामंडळाच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेली महिनाभर विलीनीकरण या एकाच मागणीसाठी हजारो एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेले आहेत. या संपामुळे एसटीचे गेल्या महिन्यात 450 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून दिवसागणिक हे नुकसान वाढत आहे.

पत्रकारांनी मेस्मा कायद्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री परब म्हणाले, एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो. अत्यावश्यक सेवा कायदा 2017 जो आहे त्यात मेस्मा लागतो. मेस्मा लावायचा का याबाबत शासन गंभीरपणे विचार करत आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाईल. सरकार कठोर पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत नाही. पण आम्हाला जनतेचाही विचार करावा लागेल.

एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागत नाही

अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा सूचक इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागत नसल्याचं म्हटलंय. भारतीय राज्यघटनेचा मी अभ्यासक आहे. सरकार पराभूत मानसिकतेत आहे. अनिल परब भीती निर्माण करत आहेत. माणसं पदवी घेतात पण त्यांचा कायद्याचा अभ्यास किती आहे हा प्रश्न आहे. मेस्माचा माझा अभ्यास आहे. जो पर्यंत राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोवर मेस्मा लागत नाही. तुमच्या वक्तव्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत. त्यासाठी मी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here