मुंबई,दि.5: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडी कोठडीत आहेत. त्यांच्यावर माजी पोलीस आयुक्त यांनी 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. आता याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP)निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांचा नंबर आला आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांचा नंबर आला आहे. वसुलीचा पैसा मुलगा, जावई, भागीदार… आणि अनिल परब यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपर्यंत पोहोचत होता.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांना ईडीने समन्स बजावला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहे. काल अनिल देशमुख यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता ईडीने ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स बजावला आहे. आज त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. अनिल देशमुख आणि ऋषिकेश यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे.
#AnilDeshmukhArrested now turn of other BENEFICIARIES . Son, Damad, Partners….& Flow of #VASOOLI funds to NCP, ShivSena….. Leaders including #AnilParab @BJP4India pic.twitter.com/DuaKGFVeO7
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 5, 2021
याआधीही ईडीनं ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावला होता. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यात परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारता येत नाही. एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा, असाही संशय ईडीने व्यक्त केला आहे.