Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनाच्या या मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

0

मुंबई,दि.२: Anil Deshmukh: मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यात यावेत असा आदेश महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) दिला होता आणि याची जबाबदारी त्यांनी सचिन वाझे यांच्यावर सोपवली होती अशी तक्रार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Paramveer Singh) यांनी केली होती. त्याची दखल घेऊन सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती.

१०० कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा धक्कादायक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी दिलेला जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अतिरिक्त  मुख्य सचिव (गृह) या पदावर असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं होतं. सीताराम कुंटेंचा जबाब अनिल देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात होतं. आता अनिल देशमुख यांनी अनिल परब यांचं नाव घेऊन प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. 

मंत्री अनिल परब यादी कुठून आणायचे?

अनिल परब पोलीस बदल्यांची यादी कुठून आणायचे असं ईडीनं विचारलं असताना अनिल देशमुखांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. “कदाचित अनिल परब शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे. आमदार त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावं अनिल परब यांच्याकडे द्यायचे आणि परब ती यादी तयार करुन माझ्याकडे द्यायचे”, असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे. 

ईडीनं केलेल्या तपासानंतर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांना एका कॅबिनेट मंत्र्यानं बदल्यांची यादी दिली होती असं नमूद केलं. त्यावर अनिल देशमुखांना विचारण्यात आलं असता त्यांनी उघडपणे अनिल परब यांचं नाव घेतलं आहे. “मला कुठल्याही व्यक्तीनं यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती”, असं अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केलं आहे. 

“बदल्यांसंदर्भातील यादी गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली होती. या यादीनुसारच बदली करावी. पण जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावं बाहेर काढा असंही तत्कालीन सचिवांना सांगितलं होतं”, असं स्पष्टीकरण देखील अनिल देशमुख यांनी जबाबात दिलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here