सोलापूर,दि.२७: सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अनगर नगरपंचायत नगराध्यक्षाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला होता. माजी आमदार राजन पाटील यांच्या सुन या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहेत. नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
सरकारच्यावतीने अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी बाजू मांडली. तर यांचे अॅड. दत्तात्रय घोडके यांनी उज्ज्वला थिटे यांच्यावतीने युक्तिवाद केला. उज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्याच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने उज्ज्वला थिटे यांचे अपील फेटाळले. जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उमेदवारी फेटाळण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला आहे.
उमेदवारी अर्जावरील सही खोडण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. पण, जर सही खोडली असा तुमचा आरोप असेल तर उमेदवाराने पोलिसांत तक्रार दाखल करायला पाहिजे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.
जवळजवळ आठ दिवसांपासून सुरू असलेल्या प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध विजयाभोवतीची कायदेशीर अनिश्चितता आता दूर झाली आहे आणि त्यांचा बिनविरोध विजय अधिकृतपणे निश्चित झाला आहे.








