अंधेरी पूर्व पोटनिवडणूक: काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला शब्द

0

मुंबई,दि.११: काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेनेला यापूर्वीच आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर सोमवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत या निवडणुकीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून आणू, असा शब्द काँग्रेस नेत्यांनी दिल्याची माहिती आहे.

या भेटीवेळी काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री अमित देशमुख, प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते. शिवसेना सचिव विनायक राऊत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, ॲड. अनिल परब हेदेखील उपस्थित होते.

राज्यातील सत्तासंघर्षामुळे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र हा निर्णय घेताना पक्षश्रेष्ठींनी विचारात न घेतल्याने काँग्रेसचे काही स्थानिक पदाधिकारी आणि मुंबई काँग्रेसमधील एक गट नाराज असल्याची चर्चा आहे.

‘अंधेरी पूर्व मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांचे प्राबल्य आहे. त्यामुळे काँग्रेसला याचा फायदा झाला असता. त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मतदारांचा कौल समजू शकला असता. या ठिकाणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला संधी दिली असती, तर चित्र नक्कीच वेगळे पाहायला मिळाले असते’ असे अंधेरी येथील एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here