सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग

0

सोलापूर,दि.13: सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत यासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांचे स्वीय सहाय्यक व सर्व शासकीय विभाग प्रमुख यांची संयुक्त आढावा बैठक घेण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत असून सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या स्वीय सहाय्यक यांच्याकडून आलेले प्रश्न, सूचना यावर विहित नियमावलीचा अवलंब करून ते प्रश्न तात्काळ सोडून सर्वसामान्यांना न्याय द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभाग प्रमुख व जिल्ह्यातील सर्व आमदारांचे स्वीय सहाय्यक यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह अन्य विभाग प्रमुख तसेच लोकप्रतिनिधी यांचे स्वीय सहाय्यक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की, लोकप्रतिनिधी यांच्या स्वीय सहाय्यकांनी मांडलेले प्रश्न यावर संबंधित विभाग प्रमुख त्वरित कार्यवाही करून त्याचा अहवाल पंधरा दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करतील व प्रत्येक महिन्यातून एकदा अशी संयुक्त बैठक घेण्यात येऊन त्या बैठकीत सर्व सामान्य नागरिकांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमाराशीर्वाद यांनी या बैठकीस उपस्थित आमदारांचे स्वीय सहाय्यक यांना प्रश्न व सूचना मांडण्याबाबत सुचित केले त्यानुसार आपले सेवा केंद्र सुरू करणे, गौण खनिज निधी वापराबाबत, गायरान जमीन, शेती महामंडळाच्या जमिनीचा वापर, खंडकरी शेतकरी यांच्या जमिनी, गुंठेवारी अंमलबजावणी करणे, नैसर्गिक आपत्तीतील अनुदान मिळणे, जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती करणे, जिल्ह्यातील चारा व पाणी टंचाई बाबत नियोजन करणे, जेऊर (ता. करमाळा) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आवश्यक जागेबाबत निर्णय घेणे, करमाळा येथील पंचायत समिती व तहसील कार्यालय दुरुस्तीसाठी निधी मिळणे, सोलापूर शहरातील एनटीपीसी व सिमेंट कारखान्याची वाहतुकीसाठी बाह्यवळण काढणे, कुडल संगम येथे पुस्तकांचे गाव निर्माण करणे, पाणंद रस्ते मोहीम राबवणे, एमआरजीएस अंतर्गत कामे घेणे, सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याबाबत मीटिंग घेणे, चिंचोली येथील तलावात पाणी सोडणे, सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील शंभर बेडचे रुग्णालय तयार असून फर्निचरसाठी निधी देणे, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्याबाबत बँका टाळाटाळ करत असल्यास त्याबाबत लक्ष देणे, माढा येथील भूसंपादनाबाबत स्वतंत्र मिटिंग घेणे, म्हैसाळ पाण्याबाबत निर्णय घेणे आदी प्रश्न, सूचना स्वीय सहायक यांच्याकडून मांडण्यात आल्या.तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी यात लक्ष घालून त्या त्वरित सोडवण्याबाबत अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी आमदार सर्वश्री सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, बबनदादा शिंदे, शहाजी बापू पाटील, सुभाष देशमुख, राम सातपुते, समाधान आवताडे तसेच आमदार प्रणितीताई शिंदे यांचे स्वीय सहाय्यक या बैठकीस उपस्थित राहून त्यांनी आपापल्या मतदारसंघातील उपरोक्त प्रमाणे विविध प्रश्न मांडले. तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अशा पद्धतीने बैठक घेतल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानून यातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न अधिक गतीने मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here