“या देशाला हिंदूराष्ट्र कोणीही घोषित करू…” अमोल मिटकरी

0

मुंबई,दि.16: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपा आमदार टी राजा सिंह यांच्या वक्तव्यानंतर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भिवंडी येथील धर्मसभेत टी राजा यांनी भाजपाला 400 जागा मिळाल्या असत्या तर देशाला हिंदूराष्ट्र घोषीत केले असते असे वक्तव्य केले. त्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची मागणीही केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती आहे.

टी राजा यांनी मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन, असे म्हटले. अमोल मिटकरी यांनी हिंदूराष्ट्र घोषीत करण्याच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. मिटकरी यांनी Xवर पोस्ट करत म्हटले आहे की, टी. राजाला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावं! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! “ग्लानिर्भवती ” “भारत” हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी राजा विसरला असावा.

या देशाला हिंदूराष्ट्र कोणीही घोषित…

अमोल मिटकरी म्हणाले की, टी. राजा या एका व्यक्तीने ४०० पार गेलो असतो तर हे हिंदूराष्ट्र झाले असते, असा अजब दावा केला आहे. कदाचित टी. राजाला हे माहिती नसावे की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिले. या संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचे नाव भारत म्हणजे स्वतंत्र भारत राष्ट्र हेच नाव देण्यात आले आहे. 400 पार नाही, तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी या देशाला हिंदूराष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here