महाराष्ट्रात लवकरच घडणार महाभारत: आमदार अमोल मिटकरी यांचं मोठं वक्तव्य

0

दि.28: राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. मात्र अजून राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही.

नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवे सरकार स्थापन होऊन आता महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी वाढली असून, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार असल्याचे सूतोवाच केले आहे.  

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे विस्तार आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिंदे आता दिल्लीत परत कधी जाणार, हेही निश्चित नाही. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि काही बैठकांनंतर शिंदे दिल्लीला रवाना होणार होते. दिल्लीत त्यांचा मुक्काम होता. ते कोणाला भेटणार, याबाबत त्यांच्या कार्यालयाने कोणतीही माहिती दिली नाही. राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत काही ज्येष्ठ वकिलांशी ते चर्चा करणार होते आणि भाजपच्या श्रेष्ठींनादेखील विस्ताराच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी भेटणार होते, अशी माहिती आहे. यावरून अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. 

शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, असेच साधारण सर्व घडामोडींवरून चित्र निर्माण झाले आहे, असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रद्द झालेल्या दिल्ली दौऱ्यांवरून महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार असल्याचे सूतोवाच अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत. तसेच अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडे यांचाही खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. अजितदादाइतके आठवड्यातून एक दिवस तरी काम करून दाखवा, बारा तासाच्या आत दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागेल. त्यांची बरोबरी तुम्हाला सात जन्मही करता येणार नाही. तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बळीराजाला वाऱ्यावर सोडून दिल्लीवारी करताहेत यावर जरा तोंड उघडा, या शब्दांत अमोल मिटकरींनी अनिल बोंडे यांना सुनावले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here