मुंबई,दि.१२: Amol Mitkari On Bharat Gogawale: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांना खोचक टोला लगावला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याचा पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून, फडणवीस-शिंदे-पवार यांच्यात मतभेद असल्याचे समोर येत आहे. तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरूनही दावे-प्रतिदावे केले जात आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केलेल्या एका विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टोला लगावला आहे. (Amol Mitkari On Bharat Gogawale)
अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये अदिती तटकरे यांचेही नाव आहे. अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यासाठी शिंदे गटातील भरत गोगावले यांचा जोरदार विरोध आहे. यावर बोलताना, मी आदिती तटकरेंपेक्षा चांगले काम करू शकतो. महिला व पुरुष यांच्यात थोडा तरी फरक येतोच ना. त्यांच्यापेक्षा मला आमदारकीचा १५ वर्षांचा अनुभव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन सहाच्या सहा आमदारांसह आमची सगळ्यांची एकच मागणी आहे, रायगडचा पालकमंत्री भरतशेठ, असे विधान भरत गोगावले यांनी केले होते. यावर आता अमोल मिटकरींनी ट्विट करत टोला लगावला आहे.
भरतशेठ तुम्ही नादच केलाय थेट! | Amol Mitkari On Bharat Gogawale
भरतशेठ तुम्ही नादच केलाय थेट! पालकमंत्री पदासाठी आपले हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे आहेच मात्र स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक आहे हे तुमचे उद्गार स्त्रीशक्तीला कमीपणा दाखवणारे आहेत. रायगडच्या मातीचे महत्व तुम्हाला यानिमित्ताने काही दिवसातच कळेल. तथास्तु, असे खोचक ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. तसेच भरत गोगावले यांना टॅगही केले आहे. पालकमंत्रीपदाचा वाद वाढतो की यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीतील तणाव वाढतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, आता बदललेल्या समीकरणामध्ये भरत गोगावलेंऐवजी आदिती तटकरेंच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपदावर आक्रमक भूमिका मांडली आहे.