सांगली,दि.9: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवराय यांच्या केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. अमित शाह यांनी समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रचारसभेत बोलताना शाह यांनी एक कथा सांगितली. ‘समर्थ रामदासांनी तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्याचे काम केले,’ असे विधान शाह यांनी केले. शाह यांनी इतिहासाचा विपर्यास केल्यामुळे महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, शहा आणि भाजपचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. इतिहास संशोधकांनी शहांच्या विधानाचा निषेध करीत तीव्र आक्षेप नोंदविला आहे.
सांगली जिह्यातील बत्तीस शिराळा येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहांची सभा पार पडली. यावेळी भाषणात अमित शहा म्हणाले, ‘समर्थ रामदासांचे पाऊल जिथे पडले ती ही पवित्र भूमी आहे. रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्याचे कार्य केले’ असे शाह म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांना तुम्ही जर जोडलं किंबहुना आणि कोणी त्यांना गुरु म्हणत आहेत तसं होऊ शकत नाही. राजमाता जिजाऊ याच त्यांच्या एकमेव गुरू होत्या.
शिवरायांनी जिजाऊ व शहाजीराजांकडून प्रेरणा घेत स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. 1642 ते 1672 या कालावधीत शिवरायांच्या संबंधांमध्ये समर्थ रामदासांचे नाव कागदपत्रांमध्ये कुठेही नोंदवलेलं नाही. रामदासांनी तरुणांना शिवरायांना पाठिंबा द्यायला सांगितले ही भाकडकथा आहे. शहांच्या विधानामागे भाजप व संघाची व्यूहरचना आहे, असा आरोप इंद्रजित सावंत यांनी केला.