सांगली,दि.8: महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सांगलीत सभा पार पडली. यावेळी अमित शाह भाषणादरम्यान आगामी मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलचे संकेद दिले.
जिथं जिथं मी गेलो, मग विदर्भ, मुंबई, कोकण, कोल्हापूर, जळगाव उत्तर महाराष्ट्रात गेलो तिथे तिथे महायुती सरकार बनवायचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचं आहे असं विधान भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सातत्याने चर्चा सुरु आहे.
अमित शाह यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण असणार? याबद्दल भाष्य केले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचीही हीच इच्छा आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.
अमित शाह यांनी फडणवीसांना विजयी करायचं आहे या विधानानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन पुढील मुख्यमंत्रीपदाचे संकेत शाहांनी दिले असंही बोललं जात आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीवरही शाहांनी निशाणा साधला. जर चुकून महाविकास आघाडीचं सरकार आले तर उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवू इच्छितात, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे. काँग्रेस पक्षात 1 डझन नेते मुख्यमंत्रीपदासाठी कपडे शिवून बसलेत असा टोला त्यांनी लगावला.