Amit Shah: गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन करताना असदुद्दीन ओवेसी यांना केली ही विनंती

0

नवी दिल्ली,दि.७: एमआयएम (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तर प्रदेशात झालेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज संसदेत निवेदन केले. ओवेसी यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा देऊ केली आहे मात्र त्यांनी ती घेण्यास नकार दिला आहे. जीवाला असलेला धोका लक्षात घेता ओवेसी यांनी असा नकार न देता सुरक्षा स्वीकारावी व आमची काळजी दूर करावी अशी माझी त्यांना विनंती असल्याचे शहा यांनी यावेळी नमूद केले.

असदुद्दीन ओवेसी हे ३ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर गेले होते. मेरठ येथील कार्यक्रम आटोपून दिल्लीला परतत असतानाच हापुडमधील एका टोलनाक्यावर ओवेसी यांच्या कारवर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती तर ओवेसी यांनीही संसदेला या घटनेबाबत अवगत करत तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. या घटनेवर गृहमंत्री शहा यांनी आज राज्यसभेत निवेदन केले. ‘ओवेसी हे ३ फेब्रुवारीला मेरठ दौऱ्यावर होते. तेथील कार्यक्रम आटोपून परतत असताना सायंकाळी साडेपाच वाजता हापुडमधील छिजारसी टोल प्लाझा येथे दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून ओवेसी सुखरूपपणे बचावले आहेत.

ओवेसी यांच्या कारला तीन गोळ्या लागल्या असून या घटनेचे तीन प्रत्यक्ष साक्षीदारही आहेत, असे शहा यांनी नमूद केले. ३ फेब्रुवारी रोजी ओवेसी यांचा जो दौरा होता त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असे नमूद करताना कारवाईबाबतही शहा यांनी माहिती दिली. ओवेसी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पिलखुआ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. दोन पिस्तुल आणि अल्टो कार जप्त करण्यात आली आहे. ओवेसी यांच्या कारची फॉरेन्सिक तपासणीही करण्यात येणार आहे, असे शहा यांनी सांगितले.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी ओवेसी यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी शिफारस केली आहे. त्यानुसार बुलेटप्रूफ कारसह झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे, असे नमूद करताना जीवाला असलेला धोका लक्षात घेता ओवेसी यांनी तातडीने या सुरक्षेचा स्वीकार करावा, अशी विनंती शहा यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here