Maharashtra Breaking: महाराष्ट्रातील महाविद्यालयं, सर्व विद्यापीठे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत

0

मुंबई,दि.५: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं जाहीर केला होता. 

सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबईत दिवसागणिक रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत काल तब्बल १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालयं देखील बंद करण्याबाबतची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर आज उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here