रावसाहेब दानवेंच्या ब्राम्हण मुख्यमंत्री वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.5: “मी ब्राह्मणाला मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो” असं वक्तव्य केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले होते. यानंतर या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. “मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतं. तृतीयपंथी व्यक्ती देखील मुख्यमंत्री होऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतं. तृतीयपंथी व्यक्ती देखील मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्याही जाती-धर्माची व्यक्ती, मुख्यमंत्री होऊ शकते. महिला देखील मुख्यमंत्री होऊ शकते आणि आपणही मुख्यमंत्री होऊ शकतात. 145 आमदारांचं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा.”

“असं कोणी काहीही सांगेल की मुख्यमंत्री अमक्याने व्हावं, तमक्याने व्हावं. अरे त्याने 145 आमदार त्याच्या पाठिशी उभे केले, तर होईल ना तो मुख्यमंत्री. मग ती व्यक्ती कोणीही का असेना,”

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असे म्हटले. 3 मे रोजी जालन्यात परशुराम जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात बोलत असताना दानवे यांनी हे वक्तव्ये केले. आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत जालना शहरात ब्राम्हण समाजाच्या लोकांना एका पेक्षा जास्त नगरसेवकपदे द्या अशी मागणी ब्राह्मण समाजातील सुनील किंगावकर यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केली होती. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here