वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्शवभूमीवर अजित पवारांचं मोठं विधानं

0

पुणे,दि.१ मे: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सने सूचना केल्यास पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाऊ शकतात असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निर्बंधांसंबधी भाष्य केलं. तसंच औरंगाबाद येथील सभेला परवानगी देताना काही अटी घालून दिल्या आहेत. त्याचं पालन संबधितांनी करावं, जेणेकरून वातावरण चांगलं राहील असं म्हणत राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला. तसंच महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून दोन, तीन दिवस ती कायम राहील. दुपारी उन्हात जायचं असेल तर छत्री वापरा असा सल्ला दिला.

“कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मास्क वापरण्यासाठी पुन्हा सांगायचं का यावरही चर्चा झाली. सध्या लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली जबाबदारी ओळखून काम करण्याचं आवाहन केलं आहे. टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही बंधनं लागू करु शकतो,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

“तुमच्या माध्यमातून अनेक बातम्या समोर येत असून त्यादृष्टीने पोलीस दल सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून आहे. एक गोष्ट खरी आहे की, अलीकडच्या काळामध्ये अनेक भागात तलवारीचा साठा सापडला आहे. यावर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसंच यातून विध्वंसपणा वाढवण्याचा काहींचा प्रयत्न दिसतोय. त्याच्या खोलामध्ये जाण्यास सांगितलं आहे. हे आताच्या काळात का सापडत आहे? यामागील मास्टरमाईंड कोण आहे? हे शोधण्यास सांगितले असून ते शोधून काढतील. पोलीस सक्षम आहेत,” असं अजित पवारांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here