मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही आमदार बाहेर पडतील: अजित पवार

0

मुंबई,दि.७: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही आमदार बाहेर पडतील असे म्हटले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही गरज नाही. त्या दोघांनीही घरी बसले पाहिजे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या टीकेला बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी उत्तर दिलं आहे. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी अजित पवारांना आता भविष्यवाणीत जास्त रस असल्याचा टोला लगावला आहे.

“मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलण्याचा मला अधिकार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच याचं उत्तर देतील. पण येत्या चार दिवसात हा प्रश्न मार्गी लागण्यास काही अडचण नाही,” असा विश्वास शहाजीबापूंनी व्यक्त केला आहे.

सचिवांकडे मंत्र्यांचे अधिकार देण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “सचिवांकडे असे कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत. विरोधकांकडून खोटा आरोप होत आहे. सचिवांच्या सहीनंतर मंत्र्यांची सही होत आहे. प्रत्येक फाईल सचिवाने तपासणे हा कामाचाच भाग असतो. त्यामुळे सचिव फाईल तपासत असतील, तर त्यात काही वावगं नाही”.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही आमदार बाहेर पडतील असा दावा अजित पवारांनी केला आहे. यासंबंधी बोलताना त्यांनी “सध्या अजित पवारांना राजकारण कमी आणि भविष्य जास्त कळायला लागलं आहे”, असा टोला लगावला.

“सध्याचे सरकार सरळ, साधं आणि सोपं आहे. कारभार मार्गी लागला असून लवकरच न्यायालयाचाही निकाल येईल. हे सरकार पुढील अडीच वर्ष वेगाने आणि चांगलं काम करणार,” असा विश्वासही शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे. “सुप्रीम कोर्टाची सुनावणी, पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी मिळवणं आणि केंद्राशी सुसंवाद साधणं यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीला जात आहेत,” असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी स्वत:ची मंत्रीपदे घेतली आणि इतर मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले, हा तर लोकशाहीचा खून आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही गरज नाही. त्या दोघांनीही घरी बसले पाहिजे,” अशी टीका अजित पवार यांनी शनिवारी चिंचवडला केली.

पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम सुरू होते. मात्र, सरकार पाडून महाराष्ट्राला अस्थिर करण्यात आले. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकट्याचेच मंत्रीमंडळ आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिनखात्याचे मंत्री आहेत. अशा मंत्रीमंडळाचा राज्यासाठी काडीचाही उपयोग नाही. इतरांनी तुमच्या दोघांकडे फक्त बघत बसायचे की, तुम्ही दिल्लीला कितीवेळा जाता ते मोजायचे. मुख्यमंत्री नुसतीच दिल्लीवारी करत आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही, याची नेमकी अडचण त्यांनी जनतेला सांगितली पाहिजे.

मंत्रीपदाची आस अनेक आमदारांना आहे. मंत्रीमंडळ जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराज आमदार फुटून बाहेर पडतील, याची भीती मुख्यमंत्र्यांना असावी. पालकमंत्री नाहीत म्हणून जिल्हास्तरीय महत्त्वाचे निर्णय रखडलेले आहेत. सरकारच्या गोंधळी कारभारामुळे राज्यातील प्रशासन ठप्प झाले आहे. यातून मार्ग निघेल, अशी कोणतीही चिन्हे नाहीत. आता खऱ्या अर्थाने ‘कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र’, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here