विधान परिषदेच्या निवडणुकीवरून अजित पवार म्हणाले

0

दि.16: महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. राज्यसभेच्या सहा जागांपैकी भाजपाने तीन जागांवर विजय मिळवला. अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपाने विजय मिळवला. एकीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या स्मार्ट खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात असताना भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. त्यामुळे अगदी चार-पाच दिवसांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत या अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्याचं कौतुक झालं होतं. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट आव्हान दिलं आहे. कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही हे विधान परिषद निवडणुकीत कळेल, असा थेट इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.

विधान परिषद निवडणुकीतील रणनीतीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल काठावर लागला आहे. पण अनुभवातून माणूस शिकतो. एखादी निवडणूक लढत असताना ज्यांच्या बाजूने निकाल लागतो त्यांच्याबाजूने कौशल्य असं म्हटलं जातं,  तर जे पराभूत झाले ते कमी पडले असं म्हणतात. राज्यसभा निवडणुकीनंतरही तसंच समजलं गेलं. मात्र आता आता या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे कौशल्य नाही हे जनतेला कळेल, अशा शब्दात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या राज्यात असलेल्या समिकरणांनुसार दहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजपाचे चार, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदान निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरस आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष आणि इतरांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, अशा परिस्थितीत एक एक मत निर्णायक ठरेल. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here