अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारत 2019 आठवण करून दिली

0

मुंबई,दि.9: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना प्रश्न विचारत 2019 ची आठवण करून दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती हा गड मानला जातो.

या पार्श्वभूमीवर भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये जाऊन भाजपा 2024 मध्ये बारामती जिंकणार, असा निर्धार व्यक्त केल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात आज पुण्यात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, 2019ची एक आठवण करून देत खोचक टोला देखील लगावला आहे.

बारामतीकरांना कुणाचं बटण कसं दाबायचं, हे चांगलं माहितीये, अशी उपहासात्मक टिप्पणी यावेळी अजित पवारांनी केली. “आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात आणि लक्ष्य करतात. गेल्या 55 वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगलं माहितीये की कुणाचं बटण कशा पद्धतीने दाबायचं. ते त्या निवडणुकीत त्यांचं काम चोखपणे बजावतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“बारामतीमध्ये माझं काम बोलतं. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील”, असंदेखील अजित पवार म्हणाले.

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना एक हुरूप येतो. आपण काहीतरी करतो वगैरे. ते अध्यक्ष बारामतीला न जाता दुसरीकडे गेले असते, तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते बारामतीला गेल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला एवढी प्रसिद्धी मिळाल”, असा टोला पवारांनी लगावला.

“मला त्या प्रदेशाध्यक्षांना एक प्रश्न विचारायचाय, की तुम्ही एवढे संघटनेत काम करणारे, पक्षाच्या जवळचे होता, तर तुम्हाला, तुमच्या पत्नीला 2019 ला उमेदवारी का नाकारली? त्याचं उत्तर द्या. त्याचं उत्तर कुणी देऊ शकत नाही. अर्थात, हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण माझं मत आहे की कुणीही बारामतीत यावं. बारामतीकर सर्वांचं स्वागतच करतात. पण मतदानाच्या दिवशी कुणाला मतदान करायचं, कुठं बटण दाबायचं, हे बारामतीकरांना खूप चांगलं माहिती आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here