पुणे,दि.१४: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. कडू यांचा उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. कडू यांची प्रकृती खालवली आहे.
अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
अजित पवारांनी पोलिसांना प्रहार संघटनेच्या आंदोलकांना बोलू द्या असे सांगितले. प्रहार संघटनेच्या आंदोलकांनी बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करण्याच्या घोषणा दिल्या. यानंतर पवार यांनी बच्चू कडू यांच्या मागण्यासंदर्भात सरकार समिती गठीत करणार असल्याचे सांगितले.








