मुंबई,दि.२५: Ajit Pawar On Wine: राज्य सरकारने (Maharashtra Government) वाईन (Wine) विक्रीला सुपर मार्केटमध्ये परवानगी दिल्यानंतर राज्यातील अनेकांनी याला विरोध केला आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी तर उपोषणाला देखील बसण्याचा इशारा दिला. या निर्णयावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
या निर्णयावरून विरोधकांनी सुरू केलेल्या आरोपांचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात देखील उमटले. हा मुद्दा विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar On Wine) त्यांच्या शैलीत केलेली टोलेबाजी उपस्थितांची दाद मिळवून गेली.
कर कमी केल्यामुळे उत्पन्न वाढलं!
मद्यावरील कर ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून टीका केली गेली. यावर कर कमी केल्यामुळे उलट उत्पन्न वाढल्याचं अजित पवार (Ajit Pawar On Wine) म्हणाले. “काही ठिकाणी दारूवर ३०० टक्के कर होता. तो आम्ही १५० टक्क्यांवर आणला. कारण जे लोक दिल्लीला जायचे, ज्यांना दारूची सवय आहे असे लोक येताना दोन्ही हातात ४-४ बाटल्या घेऊन यायचे. कारण तिथे शुल्क कमी होतं. त्यामुळे कर कमी केला. घेणारा घेतच असतो. कर कमी केल्यापासून सरकारच्या उत्पन्नात १०० कोटींवरून ३०० कोटींपर्यंत वाढ झाली आहे”, अशी माहिती अजित पवारांनी सभागृहात दिली.
थेंबालाही स्पर्श केला नाही
दरम्यान, यावेळी बोलताना आपल्यावर जबाबदारी आल्यामुळे राज्याच्या हिताचा आणि उत्पन्नाचा विचार करावा लागतो त्यासाठी हे केलं, असं अजित पवार म्हणाले. “ज्या दिवशी जन्माला आलो, तेव्हापासून आजपर्यंत एका थेंबाला स्पर्श केला नाही हे सगळ्यांना माहिती आहे. राज्याच्या उत्पन्नाचा विचारही करावा लागतो”, असं अजित पवारांनी (Ajit Pawar On Wine) नमूद केलं.
विरोध असेल, तिथे वाईन विक्री नाही
दरम्यान, वॉक-इन स्टोअर्स, मॉल, सुपमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास जर संबंधित दुकान-मालकाचा विरोध असेल, तर तिथे या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. राज्यात ४०० ते ५०० मॉलमध्येच वाईन विक्री केली जाईल. ज्यांची संमती नसेल, तिथे ठेवलं जाणार नाही. शिवाय अजूनही आम्ही ते केलेलं नाही, असं अजित पवार म्हणाले. “जनतेला जर ते नको असेल, तर आमची आग्रहाची भूमिका अजिबात नाही. नागरिकांना नको त्या सवयी लागाव्यात, वेगळा समाज निर्माण व्हावा अशी भावना कुणाचीही नसते”, असंही त्यांनी नमूद केलं.