मुंबई,दि.३१: पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या यंत्रणांना देशातील कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ही बातमी मला तुमच्याकडूनच समजली. मागच्या काळात ईडीच्या नोटीसा आल्या आहेत. ज्या संस्था आहेत, त्यांना स्वायत्ता आणि चौकशीचे अधिकार देण्यात आले आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये काही तक्रारी आल्या तर त्यांच्या प्रत्येक नागरिकाच्या बाबतीतले चौकशीचे अधिकार त्यांना आहेत. नक्की काय झालं आहे, त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा का येत आहेत, याबाबत अधिक स्पष्टपणे राऊतच सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. या यंत्रणांना देशातील कोणत्याही व्यक्तींची चौकशी करण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाली. सध्या शोधमोहिम आणि चौकशी सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली. दरम्यान, राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. यापूर्वी ईडीनं संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. परंतु संसदेचं अधिवेशन सुरू असल्याचं सांगत ते ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यांनी ईडीकडे मुदतवाढही मागितली होती. परंतु आज अचानक ईडीचे अधिकारी राऊत यांच्या घरी दाखल झाले.