मुंबई,दि.5: Ajit Pawar On Loudspeaker: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाऊडस्पीकर वादावर मोठं वक्तव्य केलं आहे. नियम सर्व धार्मिक स्थळाला लागू आहेत. राज्यात सर्वांना नियम सारखे आहेत, सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषेदेत बोलत होते. शिर्डीतील काकड आरतीलाही याचा फटका बसला आहे असे अजित पवार म्हणाले.
ज्या धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकर लावायचा आहे त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांना लाऊडस्पीकर लावता येतील. जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असेही अजित पवार म्हणाले.
राज्यात शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे, त्या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. जे कुणी कायदा सुव्यवस्था अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील त्यांनाही नोटीस पाठवून खबरदारी घेतली. कुणीही अल्टीमेटमची भाषा वापरू नये, असे अजित पवार म्हणाले.
कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. सरकार कायदा व नियमांवर चालत असतं. सर्व धार्मिक स्थळांना समान नियम लागू होईल. यूपीत अनेक साधू संतांनी, मौलवींनी स्वत:हून आवाहन करत भोंगे उतरवले. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंगे योगी सरकारनं उतरवले नाहीत. महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चालला आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे. राज्यात जितकी धार्मिक स्थळ आहेत त्यांनी रितसर परवानगी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
कायदा हातात घेण्याचं धाडस कुणी दाखवू नये. वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातील सर्व सरकारला करावी लागेल असं त्यांनी सांगितले. तसेच रात्री उशीरा 10 च्या पुढे हरिनाम सप्ताह, जागरण गोंधळ सुरू असतो. ग्रामीण भागात कार्यक्रम होत असतात. न्यायव्यवस्थेच्या निर्णयाचं तंतोतंत पालन करण्याचं ठरवलं तर सगळ्याच धार्मिक कार्यक्रमांबाबतीत तो निर्णय घ्यावा लागेल. कायद्याप्रमाणे आवाजाची मर्यादा ठेवूनच सहकार्य केले पाहिजे. मागील 2-3 दिवसांत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं सर्व पालन करत आहेत. सर्व धार्मिक स्थळांना त्याचे पालन करावे लागत आहे. कायद्याची अंमलबजावणी सगळ्यांसाठी एकसारखीच आहे. कुणालाही दुजाभाव करता येत नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.