मुंबई,दि.28: Ajit Pawar On Lok Sabha: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी अल्पसंख्याक समाजच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत गेला असे म्हणत यंदाच्या निवडणुकीचा निकाल काय लागेल हे ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही, असे म्हणाले. शिवसेनेकडे (ठाकरे गट) अल्पसंख्याक समाज वळल्याने महायुतीला लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत धास्ती वाटत आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून ते स्पष्ट दिसले.
निवडणुकीत पराभव झाला तरी | Ajit Pawar On Lok Sabha
गरवारे क्लब हाऊसमध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणात त्यांच्यामधील नाराजी स्पष्ट दिसून आली. निवडणुकीत पराभव झाला तरी खचून जाऊ नका असे सांगतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध जोरदार आघाडी घेतली होती. त्यामुळे मुस्लिम समाज शिवसेनेसोबत उभा राहिला होता. भाजपासोबत महायुतीमध्ये असलेल्या शिंदे गटाबरोबर अजित पवार गटालाही त्याचा फटका बसणार याची जाणीव झाली होती.

अजित पवार यांनी ती जाहीररीत्या बोलून दाखवली. बीड, जालना आणि परभणी या जिह्यांत तर यंदाची निवडणूक जातीवादावरच गेली होती, मराठे व मराठेतर अशी परिस्थिती तिथे होती, असेही अजित पवार म्हणाले.