पुणे,दि.30: ईव्हीएमचा उल्लेख करत अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 95 वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर महात्मा फुले वाडा येथे गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला अजित पवार यांनी भेट दिली. त्यानंतर पवार यांनी ईव्हीएम विरोधात बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना आव्हान दिले.
काय म्हणाले अजित पवार?
ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा. तसेच ईव्हीएम घोटाळा झाल्याचे सिद्ध करून दाखवा असे आव्हानच अजित पवार यांनी विरोधकांना दिले आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. ईव्हीएम घोटाळा करूनच महायुतीने निवडणूक जिंकली आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
बाबा आढाव यांना भेटल्यानंतर अजित पवार म्हणाले, काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. काही सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत. आपलं मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यानुसार बाबा आंदोलन करत आहेत. लोकसभा निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या. आमच्या 17 जागा आल्या. त्यावेळी कोणी काही म्हणाले नाही. बारामतीत माझा उमेदवार पराभूत झाला. जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
माझ्याच बारामती मतदारसंघाचे उदाहरण सांगतो. लोकसभेवेळी माझा उमेदवार 48 हजारांनी पराभूत झाला होता. आता विधानसभेला मी 48 हजाराचे लीड तोडून एक लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आलो. या जनतेचा कौल आहे, असे पवार म्हणाले.