उद्धव ठाकरे असताना एकनाथ शिंदे शिस्तीने वागायचे, मात्र आता वेगळेच पाहायला मिळत आहेत: अजित पवार

0

पुणे,दि.६: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते.त्यावेळी ते रात्री १२ नंतर हॉस्पिटलमध्ये गेले होते. हॉस्पिटल बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. हे योग्य नसून कायद्याच पालन केले पाहिजे. तसेच रात्री १० नंतर माईक बंद असणे गरजेचे आहे. पण यांचा माईक रात्री २ पर्यं चालू असल्याचं दिसून आलं आहे. पण यांना माईक बंद करायचं ते कळत नाही? तसेच उद्धव ठाकरे असताना एकनाथ शिंदे शिस्तीने वागायचे, मात्र आता वेगळेच पाहायला मिळत आहेत. कायदे, नियम करणारे राज्यकर्ते नियम मोडत असतील तर… असाही बोलणारा वर्ग असतो. ” असंही यावेळी अजित पवारांनी बोलून दाखवलं.

राज्यात सत्ता परिवर्तन होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आहे. मात्र नवीन सरकार होऊन जवळपास दीड महिना होत आला तरी देखील अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी पुण्यात बोलताना टीका केली.

“महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाही, मंत्रिमंडळचा विस्तार नाही. प्रत्येकवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना माध्यमांकडून याबाबत विचारलं जातं, तेव्हा फक्त लवकरच….लवकरच.. एवढेच शब्द त्यांच्या तोंडून निघतात. होईल…, होईल… अरे पण कधी होईल?” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

तसेच, “एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात. अतिवृष्ट होती, विविध संकटं येतात, वेगवेगळ्या घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता प्रवेश सुरू झाले आहेत, त्या संदर्भात पालकांसमोर काही अडचणी आहेत. विद्यार्थ्यांसमोर काही प्रश्न आहेत. निर्णय घेणार कोण? आम्ही दोघे आहोत…, आम्ही दोघे आहोत… पण दोघे पुरू शकतात का? याचं तरी आत्मपरीक्षण करा.” असंही पवारांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “मला त्या दोघांवर टीका करायची नाही. परंतु वस्तूस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आज ते घडत नाही याचा जबरदस्त फटका आपल्या महाराष्ट्राला बसतोय. याचं पण तारतम्य भान या लोकांना राहिलेलं नाही. आज यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीतून जेव्हा सिग्नल मिळेल त्यावेळी हे होणार आहे. तोपर्यंत कितीही गप्पा मारल्या तरी यांच्या हातून काहीही घडणार नाही, हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय.

पूर्वीच्या काळात मात्र काँग्रेस आणि शिवसेनेत निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रात व्हायचे, मुंबईत व्हायचे. दिल्लीत निर्णय होत नव्हते. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जी परंपरा महाराजांनी चालू ठेवली होती, त्याला कुठंतरी आता बाजूला सारण्याचं काम होतंय, याची पण नोंद सर्वांनी घेतली पाहिजे.” अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

तसेच पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवारा म्हणाले की, “लोकानी निवडून दिलेल्या आमदाराला अधिकार द्यायचे नाही, मंत्री करायचं नाही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं, दिल्लीवारी केल्याशिवाय मंत्रीमंडळासाठी ग्रीन सिग्नल मिळणार नाही आणि मंत्रीमंडळ अस्तिवात येत नाही, हे स्पष्ट आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here