Ajit Pawar: अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया म्हणाले…

0

मुंबई,दि.16: Ajit Pawar On Devendra Fadnavis’s Statement: अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. 2019 मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पहाटे सरकार स्थापन केले होते. ‘2019 मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना माहिती होती, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता.

अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया | Ajit Pawar On Devendra Fadnavis’s Statement

फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज्यातील नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. फडणवीसांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान त्यांनी माध्यमांना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला… | Ajit Pawar

फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलण्यास अजित पवार (Ajit Pawar) यांनी नकार दिला आहे. “मला बाकीच्यांबद्दल काहीही बोलायचे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार,” असे अजित पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना अजित पवार यांच्यसोबत घेतलेल्या शपथविधीवर भाष्य केले होते. “उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे. अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here