दि.1 जानेवारी 2022: Ajit Pawar On Corona: कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या पुन्हा वाढत आहे. अशातच ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील मंत्रिमंडाळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. “जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते,” असे संकेतही पवार यांनी दिले.
“अधिवेशनाच्या कालावधीत केवळ पाच दिवसांमध्ये 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच राज्य सरकारनं कोरोनाची नवी नियमावली जाहीर केलीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.
आताच नियम कडक का असा आग्रह करु नये
“प्रत्येकाला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे व्हावं असं वाटतंय. पण नव्यानं आलेला कोरोनाचा व्हेरिअंट वेगानं पसरत आहे. अमेरिका फ्रान्स, इंग्लंड येथे दररोज लाखो रुग्ण सापडत आहे. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमतही मोजली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सरकारही प्रयत्न करतंय. आताच नियम कडक का असा आग्रह करु नये, सर्वांनी सहकार्य करावं,” असंही पवार म्हणाले.