मुंबई,दि.9: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात नणंद भावजय यांच्यात लढत झाली. या मतदार संघात मतदान कमी झाले आहे. प्रचारादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. शरद पवार यांचा पराभव आमच्यासाठी महत्वाचा आहे, चंद्रकात पाटील म्हणाले होते.
काय म्हणाले अजित पवार?
मला आणि माझ्या कार्यकर्त्याला शरद पवार यांचा पराभव हवा आहे, असे पाटील म्हणाले होते. “चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे केलेले वक्तव्य चूक होते. त्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. चंद्रकांत पाटील यांचे ते विधान चूक होते, हे मी कबूल करतो, असंही अजित पवार म्हणाले. शरद पवार बारामतीमध्ये निवडणुकीमध्ये उभे नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही, पवार साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. त्यांनी ते बोलायला नको होतं, ते का बोलून गेले आम्हालाही माहिती नाही, असंही अजित पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी चुक झाली हे मी मान्य करतो. मी चंद्रकांतदादांना म्हणालो तुम्ही पुण्यातच काम बघा. मी आणि आमचे कार्यकर्ते बारामतीच काम बघतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर ते चुप आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.