पुणे,दि.३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात लढत होणार आहे. राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या अजित पवारांनी भाजपावर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत पवारांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुत्रावरही गुन्हे दाखल आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावरूनही, अजित पवारांनी भूमिका मांडली. गुन्हे दाखल आहेत, पण त्यात तो दोषी ठरलाय का? आता माझ्यावर 70 हजार कोटींचे आरोप झाले, ज्यांनी आरोप केले त्यांच्या सोबत मी बसलोय ना? मग आरोप म्हणजे दोषी नाही, असे स्पष्टीकरण असे अजित पवारांनी दिले.
माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता; पण ज्यांनी आरोप केले, त्यांच्याच सोबत आज मी सरकारमध्ये काम करतो आहे, भाजपमध्ये सध्या दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी तयार झाली, अशी टीका अजित पवारांनी केली होती.
एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? त्याला पासपोर्ट कोणी दिला? तो कसा पळाला? त्यांनीसुद्धा गेल्या काही वर्षात कोणाकोणाला कशी उमेदवारी दिली, याची पण माहिती काढा, असे म्हणत अजित पवार यांनी मुरलीधर मोहोळ यांनीच निलेश घायवळला विदेशात जायला मदत केल्याचे संकेत दिले. तसेच, मी पुण्यात गेल्यावर भाजपची आणि माझी यादी दाखवतो. कोणाचे उमेदवार कसे आहेत हे पाहा, मग सगळं स्पष्ट होईल, असेही अजित पवारांनी म्हटले.








