Ajit Pawar On MVA Alliance: महाविकास आघाडी लोकसभा जागा वाटपाबाबत अजित पवारांनी सांगितला पर्याय

0

मुंबई,दि.२४: Ajit Pawar On MVA Alliance: महाविकास आघाडी लोकसभा जागा वाटपाबाबत अजित पवारांनी पर्याय सुचवला आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना असल्याने गेल्या निवडणुकीत तीन पक्षांनी जिंकलेल्या २३ जागा वगळता उर्वरित २५ जागांच्या वाटपावर आधी चर्चा करून मार्ग काढावा, असा तोडगा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुचवला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या १८, राष्ट्रवादीच्या चार तर काँग्रसची एक अशा २३ जागांवर आधी चर्चा करायची नाही. उर्वरित २५ जागांची वाटणी करायची. हे करताना उमेदवार कोण हे बघून जागावाटप झाले पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.

Ajit Pawar On MVA Alliance | अजित पवार म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट यांच्यात लोकसभेच्या प्रत्येकी १६ जागा असे सूत्र ठरले आहे का, या प्रश्नावर असे काहीही ठरलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र मला माहीत नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे यापूर्वी बोलणे झाले असता त्यांनी जिंकलेल्या जागा आमच्याकडे राहाव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जागावाटपाविषयी चर्चा झालेली नाही. आम्ही सर्वानी जिंकलेल्या जागा सोडून उरलेल्या २५ जागांवर सर्वप्रथम चर्चा केली जावी. त्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील. कोणती जागा कोणत्या पक्षाला जाईल, हे ठरेल.

नंतर प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांवर चर्चा करता येईल, असेही पवार यांनी सांगितले. पवार यांनी काँग्रेस पक्षाशी आघाडीत असताना जागावाटपाचा दाखला दिला. सन २००४, २००९ आणि २०१९ च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसबरोबर आघाडीत होतो. त्यावेळी काही जागांच्या अदलाबदलीवर चर्चा झाली होती, ही चर्चा संमतीने केली जात असे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी कायम राहणार असून एकजुटीने आगामी निवडणुका लढणार हे मी तुम्हाला लिहून देतो. जे काही निर्णय होतील ते आमचे तीन पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील आणि कार्यकर्ते त्याची अमंलबजावणी करतील, असेही पवार यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here