मुंबई,दि.27: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे व लक्षणे दिल्यास चाचणी करून घेण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी ट्वीट करून माहिती दिली. अजित पवार यांनी रविवारी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं.
महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अजितदादा औषधोपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात एकनाथ शिंदे गट विरूद्ध महाविकास आघाडी असा सत्ता संघर्ष सुरू असताना कोरोनावर मात करून लवकरच कामावर परतण्याची इच्छा अजितदादांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, अजित पवार यांच्या संपर्कात गेल्या काही दिवसात जे लोक आले आहेत, त्यांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्लादेखील अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवारांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.