अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्त्या

0

बीड,दि.30: अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली आहे. या प्रकरणात शरद पवार गटाचे बबन गित्ते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर शनिवारी रात्री साडेआठ वाजता गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत दोघे जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (29 जून) रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सरपंच बापू आंधळे आणि ग्यानबा गित्ते परळीतील बँक कॉलनी परिसरात उभे होते. याप्रकरणी ग्यानबा गित्ते यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, पाच जणांनी संगनमताने शहरातील बँक कॉलनी परिसरात सरपंच बापू आंधळे व ग्यानबा गित्ते या दोघांना बोलावून घेतले.

यावेळी बापू आंधळे यांना तू पैसे आणलेस का, असे बबन गित्ते म्हणाले. तेव्हा पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. बापू आंधळे यांच्या डोक्यात बबन गित्ते याने कमरेचा पिस्तूल काढून गोळी झाडली. दुसऱ्या एकाने कोयत्याने बापू आंधळे यांच्यावर वार केले. तसेच ग्यानबा गित्ते यांना तिसऱ्याने छातीत गोळी मारून जखमी केले.

ग्रामपंचायत निवडणूक

मिळालेल्या माहितीनुसार मयत बापू आंधळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसेच बबन गित्ते यांच्या पॅनलमधून ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती आणि सरपंच म्हणून निवडून आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here