अजित पवार गटाचे RSSला प्रत्युत्तर, महायुतीत मिठाचा खडा टाकू नका

0

मुंबई,दि.13: अजित पवार गटाने RSSला प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ मासिकाच्या लेखातून भाजपच्या अपयशाचे पोस्टमॉर्टम केले आहे. अजित पवारांशी पक्षाने युती करतानाच काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतले आणि तिथेच घात झाला. भाजपच्या ब्रॅण्डला मोठा धक्का बसला. निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. नरेंद्र मोदींचीच लाट असल्याच्या अतिआत्मविश्वासात ग्राऊंड रियालिटीपासून भाजप नेते आणि कार्यकर्ते अनभिज्ञ राहिले, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षाची खरडपट्टी काढली आहे.

महाराष्ट्रात भाजपकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले, असा सवाल लेखात उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता अजित पवार गटाने जशास तसं उत्तर दिलं आहे. राजकारण्यांकडून वेगवगेळ्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेल्या असतानाच आता थेट अजित पवार गटानेच या टीकेवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय आहे लेखात?

‘ऑर्गनायझर’ मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात भाजपकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले, असा सवाल लेखात उपस्थित करण्यात आला आहे. ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे भाजप लढली त्याच काँग्रेसमधील नेत्यांना भाजपने सोबत घेतले. भगव्या दहशतवादाचे आरोप करणाऱया 26/11ला संघाचे कटकारस्थान म्हणणाऱया आणि संघाला दहशतवादी संघटना असे संबोधणाऱया काँग्रेस नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यामुळे संघ स्वयंसेवकांची मने दुखावली गेली, अशी खंत लेखात व्यक्त करण्यात आली आहे.

महायुतीत मिठाचा खडा टाकू नका

अजित पवार गटाचे प्रवक्ते तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या सूरज चव्हाण यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या टीकेला उत्तर दिलं आहे. “भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजित दादांमुळे!” असं म्हणत सूरज चव्हाण यांनी टोला लगावला आहे. “महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष कोणावर आहे हे समजून घ्या. लिहिता आणि बोलता आम्हाला पण येते,” असा सूचक इशारा सूरज चव्हाण यांनी दिला आहे. “लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका,” असंही पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here