सांगली,दि.१५: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिध्द आहेत. अजित पवार हे त्यांच्या रोखठोक भाषणांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. राज्य सरकारने करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क ऐच्छिक केलं आहे. मास्क न घालणाऱ्यांकडून आकारला जाणार दंड आणि होणारी कारवाई रद्द करण्यात आल्यापासून अनेकजण मास्क शिवायच प्रवास करताना आणि सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसतात. मात्र अजित पवार हे मास्क घालूनच पत्रकार परिषद घेतात तसेच दौऱ्यावरही कार्यकर्त्यांना भेटताना मास्क घालूनच असतात. मात्र आज सांगलीमधील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मास्क काढल्याचं दिसून आलं. मात्र हा मास्क काढण्याआधी त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये मास्क काढण्याची मागणी करणाऱ्या पत्रकारांना टोला लगावला.
अजित पवार आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे काल सायंकाळी सांगलीमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे खासदार संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पाटील यांनी फार आग्रह केल्याने आपण या लग्नासाठी काल सायंकाळीच सांगलीमध्ये दाखल झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. मात्र तत्पुर्वी अजित पवार पत्रकार परिषदेसाठी दाखल झाले आणि माईक्स ठेवलेल्या टेबलसमोर बसले. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना मास्क काढायला सांगितलं. यावर अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये पत्रकाराला उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून पत्रकारांबरोबरच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
अजित पवार हे त्यांच्या मास्क वापरण्याच्या सवयीमुळे मागील काही काळापासून चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सभागृहामध्येच सर्व आमदारांना मास्क घालण्यावर खडे बोलही सुनावले होते.
पत्रकाराने मास्क काढा म्हटल्यानंतर अजित पवारांनी, “हमम… मास्क काढा. अजून कपडे काढायला लावा मला,” अशी प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया ऐकून सारेच हसू लागले. पुढे हसतच बोलताना अजित पवार यांनी, “आम्ही दोन वर्ष मास्क लावून प्रेस घेतो. कुठं कोणी सांगितलं नाही. सांगलीचं मला काही कळत नाही बाबा,” असं म्हटलं.