शिंदे आणि फडणवीस हे दोनजण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत: अजित पवार

0

पुणे,दि.१४: विरोधात असताना भाजपाने पेट्रोल आणि डिझेलवरील कर ५० टक्के कमी करा, अशी मागणी केली होती. मात्र, आता भाजपाचे सरकार आहे. मग त्यांनी कर ५० टक्के कमी का नाही केला? असा सवाल करत जर इंधनावरील कर ५० टक्क्यांनी कमी केला असता तर, डिझेलचे दर ११ रुपयांनी कमी झाले असते आणि पेट्रोलचे दर १७ ते १८ रुपयांनी कमी झाले असते. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. मात्र, त्या तुटपुंज्या आहेत. सरकार बदल्यानंतर आम्ही काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीसांकडून सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

मी अर्थमंत्री असताना गॅसवरील कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्यात आला. त्यामुळे सरकारी तिजोरीवर १ हजार कोटींचा भार पडला. आता सत्तेत असलेले त्यावेळी विरोधात होते. सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील करात ५० टक्क्यांनी कपात करावी, अशी त्यांची मागणी होती. आता हीच मंडळी सत्तेत आहेत. मात्र त्यांनी इंधनावरील कर ५० टक्क्यांनी कमी केलेला नाही, याकडे पवारांनी लक्ष वेधलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिंदे आणि फडणवीस हे दोन जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्याच खांद्यावर आहेत. सरकारकडे १६५ आमदारांचं पाठबळ आहे. पण घोडं कुठे पेंड खात आहे? मंत्रिमंडळाचा विस्तार करायला सरकार का घाबरतंय? असे सवाल पवारांनी उपस्थित केले. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती आहे. मंत्रिमंडळ असतं, पालकमंत्री असते तर पूरग्रस्तांना सक्षमपणे मदत करता आली असती, असं पवार म्हणाले.

अडीच वर्षात मी कधी माईक कधी खेचला नाही

अडीच वर्षात मी कधीच उद्धवजींसमोरचा माईक खेचून स्वत:कडे घेतला नाही. ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढाओढी असेल तर महाराष्ट्राने हे पाहावं, अशा शब्दांत अजित पवारांनी फडणवीसांना चिमटा काढला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here