मुंबई,दि.१६: Ajit Pawar: राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार (Ajit Pawar) यांचा मिश्किल आणि हजरजबाबी स्वभाव सर्वश्रुत आहे. काही वेळा अजित पवार आपल्या अशा हजरजबाबी विधानांमुळे अडचणीत देखील सापडल्याची उदाहरणं दिसून येतात. मात्र, बहुतेक वेळा अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळतं.
मग ती एखादी पत्रकार परिषद असो किंवा एखाद्या राजकीय कार्यक्रमाचा मंच असो. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत असताना अशाच एका प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकवून गेलं!
चहापानावर बहिष्कार
अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते या भूमिकेतून आज विरोधकांची बाजू पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर टीका केली. तसेच, त्यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार टाकत असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं.
संतोष बांगर प्रकरण
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी संतोष बांगर प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केलं. संतोष बांगर यांनी सोमवारी हिंगोलीतील एका मध्यान्न भोजन केंद्रावरील निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा मुद्दा उपस्थित करत संबंधित केंद्राच्या व्यवस्थापकालाच कानशिलात लगावली. तसेच, “मला टीकेची पर्वा नाही, लोकांसाठी कायदा हातात घ्यायला मी तयार आहे”, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर “सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी राज्य सरकारचे कान टोचले. संजय बांगर यांना देखील सुनावलं.
धन्य आहे सगळं
यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. “शेतीच्या नुकसानाचे पंचनामे अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी एवढी वाट पाहावी लागत आहे का?” असा प्रश्न एका पत्रकाराने उपस्थित करताच अजित पवारांनी त्यावर टोला लगावला.
“तुम्हाला कुणी सांगितलं विरोधी पक्ष कमकुवत आहे? त्यांच्यावर प्रभाव पाडायला आम्ही आता काय केलं पाहिजे? त्यांच्या आमदारांसारखं कुणाला मारायला उठू का काय? अवघडच काम आहे. आम्ही सगळे बसलोय. भूमिका मांडतोय. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलोय. त्यांना निवेदन दिलंय. धन्य आहे सगळ”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.