Ajit Pawar | विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मागितली माफी

या अधिवेशनात अजित पवार यांना दोन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा माफी मागावी लागली आहे

0

नागपूर,दि.22: Ajit Pawar | विरोधी पक्षनेते अजित पवारांनी माफी मागितली आहे. संतापून राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांसाठी अपशब्दाचा वापर केला. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या संतापात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जयंत पाटील (Jayant Patil News) यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्यानंतर मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी बाकांवरून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. पाटील यांना निलंबित करण्यात आले.

जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

जयंत पाटलांच्या या विधानानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. तसंच जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटील यांचं वक्तव्य तपासण्यात आलं आणि मग त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अजित पवारांनी मागितली माफी

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी माफी मागितली. तसंच असं वक्तव्य कुणीही करू नये, असं स्पष्ट मत पवारांनी मांडलं. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. या अधिवेशनात पवार यांना दोन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा माफी मागावी लागली आहे.

अजित पवार
यापूर्वीही पवारांनी व्यक्त केली होती दिलगिरी

कालच छगन भुजबळ यांनी मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. छगन भुजबळांच्या या विधानावर भाजपचे आमदार आक्रमक झाले. यानंतर भाजप आमदार मनिषा चौधरी भुजबळांचा विरोध करू लागल्या, तेव्हा भुजबळ त्यांना ए बस खाली असं म्हणाल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी केला. तसंच छगन भुजबळ यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदारांनी केली. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं.

‘मुंबई सर्वांची आहे, मुंबईबाबत कुणीही असं वक्तव्य करू शकत नाही. महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी आमची भूमिका आहे. पण काहींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं पवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here