औरंगाबाद,दि.३१: एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज्य सरकारवर टीका करत इशारा दिला आहे. राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला नुकतीच परवानगी दिली असून त्यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. या मुद्द्यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी किराणा दुकान व सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध केला आहे. किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये सुरू होणाऱ्या वाईन शॉपला फोडणार असल्याचा थेट इशारा जलील यांनी दिला आहे.
औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जलील म्हणाले की, आमची स्पष्ट भूमिका आहे की, सरकारने वाईनची दुकान उघडून दाखवावी आम्ही ती फोडणार, कारण समाजात एक नवीन प्रथा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जर असे होत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. त्यामुळे आम्ही हे खपवून घेणार नाही. त्यामुळे जर तुम्ही वाईन दुकान उघडण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही सुद्धा फोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं जलील म्हणाले.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आव्हान
यावेळी बोलताना जलील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यात असलेल्या ठाकरे सरकारला माझा थेट इशारा आहे की, तुम्ही औरंगाबाद मध्ये येऊन वाईन दुकानाचे उद्घाटन करून दाखवाच, ती दुकान मी स्वतःता फोडून दाखवतो. तुम्हाला माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचे करा, पण आम्ही मागे हटणार नाही ,असा थेट इशारा जलील यांनी दिला आहे.