कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली ही मागणी

0

मुंबई,दि.27: कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं राज्यात पुन्हा मास्कसक्ती (Mask Mandatory) करावी अशी मागणी सर्व जिल्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांसदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मास्कच्या विषयावर चर्चा झाली. दरम्यान नागरिकांमध्ये मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र कोरोनाची वाढती संख्या पाहता कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यात लसीकरण आणि कोरोना टेस्टिंग वाढवण्यावर भर द्यावा असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा सरकारचा विचार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. आपलं राज्य सेफ झोनमध्ये आहे. आज 929 ॲक्टिव्ह केसेस आहेत. पर मिलियनमध्ये आपण खूप कमी अहोत. दर लाखामागे राज्यात 7 केसेस आहेत. टेस्टिंग वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासोबतच ट्रॅकिंग सुद्धा आम्ही करणार आहोत. पॉझिटिव्ह केसेसचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येईल. इसीआरपीटू दोनच्या खर्चांतर्गत जो निधी देण्यात आला आहे त्यामध्ये आपलं राज्य खूप पुढे असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here