शरद पवारांनी ब्राह्मण संघटनांसोबतच्या बैठकीनंतर भूमिका केली स्पष्ट

0

पुणे,दि.२२: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत ब्राम्हण समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी पक्ष ब्राम्हण विरोधी असल्याचा दावा केला जात असतो, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. शरद पवार यांनी पुण्यात ब्राह्मण संघटनांसोबत बैठक केल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दवे नावाच्या व्यक्तीने मला फोन करून भेटीसाठी वेळ मागितली होती. यानंतर आपण या बैठकीचं आयोजन केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच कुठल्याही जात-धर्माविरोधात वक्तव्य करू नये, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या असल्याचंही पवारांनी नमूद केलं.

शरद पवार म्हणाले, “दवे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. इतरही संघटनांना मला भेटायचं होतं. त्यानुसार मी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना भेट निश्चित करण्यास सांगितलं. एकूण ४० लोक या बैठकीला होते. त्यांनी काही मुद्दे माझ्यासमोर मांडले. त्यांच्यात एक अस्वस्थता होती. ती अस्वस्थता माझ्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत होती. हे विधानं केल्यानंतर पक्षात आमची चर्चा झाली. त्यात कुठल्याही जात, धर्म याविरोधात कोणीही वक्तव्य करू नये असं आम्ही सांगितलं. याबाबत आम्ही बैठकीत माहिती दिली.”

आरक्षण नाही

“ब्राह्मण संघटनांची दुसरी मागणी होती की ग्रामीण भागातील हा वर्ग शहरी भागात येत आहे. त्यामुळे त्यांना नोकरीत अधिक संधी मिळण्याची स्थिती हवी आहे. आम्ही केंद्र आणि राज्याची माहिती गोळा केली होती. त्यात नोकऱ्यांमध्ये त्यांची लोकसंख्येनुसार संख्या अधिकच दिसली. त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचं सूत्र बसणार नाही असं मी सांगितलं,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

“काहींनी कुणालाच आरक्षण नको असं म्हटलं. मात्र, मी मागास घटकांना आरक्षण द्यावंच लागेल असं सांगितलं. तसेच आरक्षणाला विरोध करू नये, असंही मी सांगितलं. आपल्या राज्यात विविध समाजांना मदत करण्यासाठी महामंडळं आहेत. तसं ब्राह्मण समाजासाठी परशूराम महामंडळ काढावं अशी त्यांची मागणी होती. तो प्रश्न राज्य सरकारचा आहे असं मी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन त्यांची आणि यांची भेट घडवून आणेन असंही आश्वासन दिलं,” असं पवारांनी नमूद केलं.

समज दिली

ब्राह्मण समाजाबाबत वक्तव्य करणाऱ्या पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर बोलताना शरद पवार म्हणाले, “मी पक्षातील नेत्यांना समज दिली आहे. त्यापेक्षा अधिक मी काही करू शकणार नाही. राज्यात वातावरण खराब झालं असं मला वाटत नाही. मात्र, जबाबदार पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी केलेल्या काही वक्तव्यांना काही वर्ग अस्वस्थ होऊ शकतो. अशावेळी जाणकारांनी चर्चा करून ती अस्वस्थता कमी केली पाहिजे.”

“माझ्याकडे पहिल्यांदाच ब्राह्मण समाजाच्या संघटनांकडून भेटीची मागणी करण्यात आली. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेण्यासाठी मी ही बैठक घेतली,” असंही पवारांनी नमूद केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here