नवी दिल्ली,दि.३: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाच्या यशामुळे सत्तांतर होण्याची तर मध्य प्रदेशात भाजपा सत्ता कायम राखण्याचा अंदाज आहे. सध्याच्या मतमोजणीच्या कौलनुसार भाजपा या तिन्ही राज्यांत सत्ता स्थापन करू शकणार आहे. तर, तेलंगणात बीआरएसचा धोबीपछाड करत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राजकीय सध्यस्थितीवरून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
सायंकाळी ६.३० पर्यंतच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये भाजपा ३४ आणि काँग्रेस ३६, मध्य प्रदेशात भाजपा १६३ आणि काँग्रेस ६६, राजस्थानमध्ये भाजपा ११५ आणि काँग्रेस ६९ आणि तेलंगणात काँग्रेस ६४, बीआरएस ३९ आणि भाजपा ४ जागांवर आघाडीवर आहे. येत्या काळात हा निकालही स्पष्ट होणार आहे. म्हणजेच, चारपैकी तीन राज्यांत भाजपाची यशस्वी वाटचाल सुरू आहे तर, तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. यावरून राहुल गांधी यांनी पोस्ट केली आहे.
“मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रतेने स्वीकारत आहोत. विचारांची लढाई सुरूच राहील”, असं राहुल गांधींनी अपयश स्वीकारत म्हटलं आहे.
तर, “तेलंगणाच्या लोकांचे मनापासून आभार. लोकांचं तेलंगणा बनवण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहील. सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या मेहनत आणि समर्थनासाठी मनपूर्वक आभार”, असं राहुल गांधी म्हणाले.