मुंबई,दि.१०: शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली, एकीकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरून शरद पवार आणि अजित पवार गटात वाद सुरू असताना दुसरीकडे आज दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार सगळे स्नेहभोजनासाठी जमले होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी आहे.
पवार कुटुंबाचे मनोमिलन आणि अजित पवारांचा दिल्ली दौरा हा योगायोग म्हणायचा की अन्य काही कारण याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून डेंग्यूमुळे अजित पवार हे घरी विश्राम घेत होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण यासारखे मुद्दे पेटले असताना सार्वजनिक असो वा सरकारी कार्यक्रमात अजित पवारांची अनुपस्थिती सातत्याने जाणवून येत होती.
नुकतेच निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार गटाने अजित पवार गटावर गंभीर आरोप केला होता. अजित पवारांनी आयोगात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा दावा शरद पवार गटानं केला, त्यात अनेक मृत व्यक्तींचे, अल्पवयीन मुलांचे आणि जी पदे राष्ट्रवादीच्या संविधानात नाही अशांचे प्रतिज्ञापत्र दिल्याचे शरद पवार गटानं म्हटलं. त्याचसोबत अजित पवार गटावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही शरद पवार गटानं निवडणूक आयोगासमोर केली.
इतक्या घडामोडी घडताना अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली, त्यानंतर अजित पवार दिल्लीला गेले, दुपारी २ च्या सुमारास ते दिल्लीत पोहचले असून अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांसोबत पक्षाचे नेते प्रफुल पटेल हेदेखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं पुढे काय घडणार असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.