मुंबई,दि.3: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद येथे (दि.1 मे) सभा झाली. राज ठाकरे यांनी लाऊड स्पीकर वादावर 4 मे पर्यंतचा अल्टिमेट दिला होता. राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सभेतील भाषणानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राज ठाकरेंसोबत सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या सभेचे व्हिडीओ पाहिल्यानतंर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे.
औरंगाबादमधील सभेवरून राज्यातील वातावरण ईदच्या संध्येला तापू लागले आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मनसेचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पोलीस फौजफाटादेखील वाढला आहे.
सायंकाळपर्यंत पोलीस राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थवर नोटीस घेऊन पोहचण्याची शक्यता आहे. या कारवाईआधी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तासभर बैठक झाली होती.
या साऱ्या घडामोडींवर राज ठाकरे कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. ही भूमिका ते ट्विटरवरून मांडण्याची शक्यता आहे. तर काही वेळापूर्वी राज ठाकरे त्यांच्या घराच्या गॅलरीमध्ये आले होते.
“सुरुवातीपासूनच ज्या पद्दतीने सभेला परवानगी न देणं, जाचक अटी टाकणं सुरु होतं त्यावरुन राज्य सरकारचा राज ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसत होतं. सभेला इतकेच लोक असले पाहिजेत अशी अट याआधी टाकली होती का? राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याने गुन्हा दाखल झाला आहे. यामधील एकही कलम हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारं नाही,” असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
राज ठाकरेंना अटक होण्याच्या शक्यतेसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “जर अशाप्रकारे सरकार वागत असेल तर रस्त्यावरील संघर्ष पहावा लागेल. तुम्ही अन्यायकारकरित्या अडकवणार असाल तर महाराष्ट्र सैनिक संघर्षाला तयार आहे. मग सरकारनेही संघर्षाची तयारी ठेवावी”.
“गुन्हे दाखल होण्याला आम्ही घाबरत नाही. आमच्यावर अनेक केसेस आहेत. 16 वर्षांपासून आम्ही संघर्ष करत आहेत,” असंही ते म्हणाले. उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घाबरवण्यासाठी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे. पण महाराष्ट्र सैनिक घाबरणारा नाही. 100 टक्के उद्या आंदोलन होणार असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “कारवाई होताना दिसत नाही. कृती आणि बोलण्यात अंतर आहे. एकीकडे अनधिकृत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देण्याचा सपाटा लावणार आणि हिंदू मंदिरांवर परवानगी देत नाही ही कृती कोणत्या कायद्याखाली येते. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यात हे सरकार नालायक ठरत आहे”.