सोलापूर,दि.२८: खानदानी दुश्मनीतून दोघांचा खून केला व एकास गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपी हनुमंत बोराडे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी हनुमंत बोराडे याची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाची हकीकत अशी की, मयत कृष्णा पाटील व आरोपी बोराडे यांच्यात खानदानी दुश्मनी आहे. आरोपींनी पूर्व वैमनस्यातून कृष्णा पाटील यास जीवे ठार मारण्याचा कट केला व कट रचल्याप्रमाणे कृष्णा पाटील, माणिक सातपुते व सुदाम चव्हाण असे तिघे मोटरसायकल वरून बार्शीकडून ताडसौंदने गावाकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोरात धडक देऊन खाली पाडून डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने डोक्यात, पोटावर, हातावर पायावर ,सपासप वार करून कृष्णा पाटील व माणिक सातपुते या दोघांचा खून केला व सुदाम चव्हाण यास गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, या आरोपाखाली आरोपी हनुमंत बोराडे यास अटक करण्यात आलेली होती.
बार्शी सत्र न्यायालयाने आरोपी हनुमंत बोराडे याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्यासमोर झाली. आरोपीचे वकील व सरकारी वकीलांचा युक्तिवाद होऊन न्यायमूर्तींनी आरोपी हनुमंत बोराडे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. वीरा शिंदे यांनी काम पाहिले.